शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका, वेतन अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने दिला आत्मदहनाचा ईशारा
भंडारा : तब्बल १२ महिन्यांपासून पगार झालेला नाही, घर लिलावात काढण्याची वेळ आली, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? अशा मानसिक तणावातून जात असलेल्या एका शिक्षकाने अखेर आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वेतन अधिकारी हे हेतूपुरस्पर पगार काढण्यास टाळाटाळ करीत असल्याने येत्या ७ एप्रिल रोजी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा या शिक्षकाने पालकमंत्री, शिक्षणविभाग यांना निवेदनातून दिला आहे.
विकास देवराम वंजारी यांच्या तक्रारीनुसार, ते २००४ पासून सरस्वती विद्यालय, शिंगोरी या शाळेत कार्यरत होते. मात्र शाळेची पटसंख्या शून्य झाल्याच्या कारणावरून १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांचे समर्थ विद्यालय लाखनी येथे समायोजन करण्यात आले. त्यांनी नियमितपणे अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले असतानाही, त्यांचे वेतन काढण्यास येत नाही आहे. नियमानुसार समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन नव्या शाळेतून मिळणे आवश्यक असते. मात्र कोणतेही कारण नसताना पगार काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वंजारी यांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, गृहकर्ज थकीत राहिल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, भंडारा शाखेने त्यांच्या घराचा लिलाव जाहीर केला आहे. तसेच, मुलांचे शिक्षण, आरोग्य, आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण झाले आहे, असे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


