अवैध ! श्री अनाथ सेवा आश्रमाचा भांडाफोड ; जिल्हा महिला व बालविकास विभागाची कार्यवाही
नागपूर : बाल न्याय अधिनियमानुसार आवश्यक असलेले नोंदणी प्रमाणपत्र नसताना अनाथ सेवा आश्रमच्या नावाने ५०० ते १० हजार रुपये सर्वसामान्य लोकांकडून वसूल केले जात होते. येथे १६ अल्पवयीन मुले असून त्यातील काही अनाथ असल्याचे आश्रमातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चमूने या आश्रमाचा भांडाफोड केला. तसेच पाचपावली पोलिसांच्या मदतीने दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली.
आमचा आश्रम खूप जुना असल्याचे सांगून श्री अनाथ सेवा आश्रम या नावाने लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी एजंट ठेवले होते. घरोघरी फिरून ते अनाथ मुलांचा संदर्भ देऊन पैसे गोळा करू लागले. संवेदनशील मनाच्या नागरिकांनी अनाथ मुलांना मदत करणे पुंण्याचे काम आहे, असे समजून मदतही केली. एजंटच्या रजिस्टरमध्ये याची नोंद असल्याचेही आढळून आले. हिंगणा, बुटीबोरी, सेमिनार हिल्स, खडगाव रोड अशा शहराच्या वेगवेगळ्या भागांतील नागरिकांनी मदत केली. एजंटकडे असलेल्या पत्रकात ‘अनाथ निराश्रित’ असा स्पष्ट उल्लेख आहे. यात मदतीसाठी पॅकेजच तयार करण्यात आले होते. कापड खर्च ५०० रुपये, एक वेळचा नाश्ता १ हजार रुपये, एक वेळचा भोजन खर्च १५०० रुपये, बर्थडे खर्च ३ हजार रुपये, एक दिवसाचा भोजन मिष्टान्न खर्च ३५०० रुपये, औषधोपचार खर्च ७ हजार रुपये, इतर खर्च १० हजार रुपये, अशा खर्चाचा त्यात समावेश होता. आमच्याकडे १६ अनाथ मुले असल्याचेही हे एजंट नागरिकांना सांगत होते.

‘वाढदिवस साजरा करायचा आहे’, असे सांगितल्याबरोबर आश्रमातील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे अनाथ मुले असल्याचे सांगितले. १६ मुले असल्याचा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात तिथे तिघेच आढळून आले. हा आश्रम अवैध असल्याची खात्री पटल्यानंतर पाचपावली पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांची चमू येण्यास तास ते दीड तास लागला. या वेळात तीन मुलांपैकी एक मुलगा तिथे नव्हता. अखेर दोन अल्पवयीन मुले असल्याने त्यांची सुटका करण्यात आली. बाल न्याय अधिनियमानुसार नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आश्रम चालकाने पोलिसांसमोर कबूल केले. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलिस करीत आहेत.

