मांढळ येथे बार मध्ये चोरी तर सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न ; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
(सोमेश्वर वैद्य)
मांढळ :- तालुक्यातील व्यापार नगरी मांढळ येथे अज्ञात चोरट्यांनी बियर बारचे कुलूप तोडून नगदी रक्कम लंपास करत इतर सहा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

मांढळ येथील वग रोडवरील सिल्वर बार अँड रेस्टॉरंट येथे रविवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बारचे कुलूप तोडून बार मधील कॅश ड्रायव्हर मध्ये ठेवलेले 2830 रुपये लंपास केले. शिवाय लगतच असलेल्या सुरज मांढरे यांचा पानठेला , कुणाल नान्हे यांचा पानठेला व विकास राऊत यांच्या टी-स्टॉल आदि ठिकाणी कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर मांढळ बस स्टॉप जवळील गुरुकृपा अग्रो एजन्सी,निर्मल उज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी व गणेश वस्त्रालय येथे खिडक्यांचे लोखंडी रॉड तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बार व्यतिरिक्त इतर कुणाचीही रक्कम व वस्तू चोरी गेल्या नाही. कुही पोलिसांनी बारमालक संदीप सुखदेवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चांगदेव कुथे करत आहेत.



