दहशतवादी म्हणत अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्याला मारहाण ; नागपूरमधील घटना

दहशतवादी म्हणत अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्याला मारहाण ; नागपूरमधील घटना

नागपूर : मूळच्या अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यादवनगर भागात ही घटना घडली आहे. फहीम खान मामातुर मर्जक ( वय 46 वर्ष) असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

फहीम खान मामातुर मर्जक हे गेले अनेक वर्षे नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात सरताज कॉलनीत राहतात. ते शहरात फिरून ब्लँकेट विकतात. फहीम मूळचे अफगाणिस्तानातील निवासी आहेत. एका परिचित व्यक्तीसोबत ते कारमधून एका ग्राहकाकडे फ्रीज बघायला गेले होते. रात्री पावणेबारा वाजता ते कारने परत जायला निघताना पार्किंगजवळ एका तरुणाने त्यांना गाठले. त्या तरुणाने फहीम यांना ‘तू दहशतवादी आहेस आणि इथे यायचे नाही,’ असे म्हटले. फहीम यांनी त्यावर ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले. मात्र, तरुणाने त्यांना धमकावले. त्यानंतर फहीम यांना मारायला सुरुवात केली. फहीम यांच्या साथीदारांनी त्या तरुणाला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र अन्य दोन आरोपी दुचाकीने तेथे पोहोचले. त्यांनी देखील फहीम यांना मारहाण सुरू केली.

पहिल्या आरोपीने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने फहीम यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात फहीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर फहीम यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्या अजय चव्हाण (30), ऋषी (20) व मयंक (19) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.