१० वर्षीय कैवल्य अवयवदानाने चार जणांना जीवन देऊन गेला : खाटिक कुटुंबाचा प्रेरणादायी निर्णय

१० वर्षीय कैवल्य अवयवदानाने चार जणांना जीवन देऊन गेला : खाटिक कुटुंबाचा प्रेरणादायी निर्णय

नागपूर : १० वर्षीय कैवल्य खाटिकच्या अवयवदानाने चार जणांना जीवनदान मिळालं आहे. एकुलता एक मुलगा गमावूनही त्याचे पालक नितीन आणि मोनाली खाटिक यांनी धाडसी निर्णय घेत अवयवदान केले आहे. या कृतीने चार कुटुंबांमध्ये आशा निर्माण झाली आणि कैवल्य अमर झाला.

कैवल्य खाटिक, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडाळा (पैकू) गावचा. त्याचे वडील नितीन आणि आई मोनाली दोघेही अभियंता आहेत. नोकरीनिमित्य ते ठाण्यात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, पुढील उपचारासाठी त्याला नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे वैद्यकीय तपासणीनंतर कैवल्यच्या मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले आणि डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. पालकांवर आभाळच कोसळलं. रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समुपदेशनामुळे खाटिक दांपत्याने कैवल्यचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कैवल्यचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे चार वेगवेगळ्या रुग्णांना दिले गेले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) नागपूरच्या मार्गदर्शनात, कैवल्यचे हृदय चेन्नईतील एका रुग्णालयात ७ वर्षीय मुलीला, यकृत नागपूरच्या हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यासाठी वापरले गेले. दोन्ही मूत्रपिंडे एम्स नागपूरमधील १६ आणि १७ वर्षीय दोन तरुणांना प्रत्यारोपित करण्यात आले.

कैवल्यच्या अवयवदानामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. एका छोट्या जीवाच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असली, तरी त्याच्या पालकांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे चार कुटुंबांत नवजीवनाचे हास्य उमलले आहे. खाटिक कुटुंबाचा हा निर्णय प्रेरणादायी ठरत असून, सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.