राज्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन ; कुहीत विविध उपक्रमांची तयारी
कुही – राज्यभरात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनानुसार कुही तालुक्यातही या सप्ताहात नागरिकांच्या हितासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तहसिलदार अमित घाटगे यांनी नागरिकांना या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महसूल सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी “महसूल दिन” साजरा करून होणार असून, या दिवशी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांपैकी पात्र कुटुंबांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जाईल. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण रस्त्यांचेही जतन होणार आहे. ४ ऑगस्टला “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रत्येक मंडळनिहाय राबवण्यात येणार असून, महसूल प्रशासन अधिक गतिमान व जनहितकारी व्हावे या उद्देशाने विविध सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी प्रक्रियेतून वंचित लाभार्थ्यांना थेट मदतीचे वाटप करण्यात येईल. घरभेटी घेऊन हे लाभ थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जातील. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवणे, शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणांनुसार योग्य निर्णय घेणे (जसे की नियमानुकूल करणे अथवा सरकारजमा करणे) यावर भर दिला जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी M-Sand धोरणाच्या अंमलबजावणीसह नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) प्रमाणे कामकाज राबवण्यात येणार असून, याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभही पार पडणार आहे.

या सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार अमित घाटगे यांनी केले असून, यामुळे शेतकरी,नागरिक, व विशेषतः वंचित घटकांना थेट लाभ मिळणार आहे. महसूल विभागाच्या जनकल्याणकारी भूमिकेचा हा एक सकारात्मक टप्पा ठरणार आहे.


