गोठणगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाचा बेजबाबदार कारभार ; शिकवायचे सोडून विद्यार्थ्यांना जुंपतात कामाला

गोठणगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाचा बेजबाबदार कारभार ;

शिकवायचे सोडून विद्यार्थ्यांना जुंपतात कामाला

कुही – शासन लाखो रुपये खर्चून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योजना राबवत असले तरी गोठणगाव जि.प. उच्च प्राथमिक शाळेत वास्तव मात्र धक्कादायक आहे. शाळेचे मुख्याध्यापक संपत लुचे यांच्या हलगर्जी व निष्काळजी कारभारामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण उध्वस्त झाले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात असल्याचा आरोप पालक व शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.

मुख्याध्यापक लुचे नेहमीच शाळेत उशिरा येतात. वेळेत आल्यावरही वर्गावर न जाता दिवसभर ऑफिसमध्ये बसून राहतात. १ ली ते ८ वीपर्यंतचे वर्ग आणि फक्त चार शिक्षक असतानाही लुचे सरांचा निष्काळजीपणा ठळकपणे जाणवत असून विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. शाळेच्या वेळापत्रकाबाबत वारंवार सूचना करूनही त्यांनी वेळापत्रक न लावणे ही त्यांच्या कामचुकार वृत्तीची ज्वलंत उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे तर दोन परिचारक असतानाही परिपाठ सुरू असताना विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता, पाणी टाकी साफसफाई यासारखी कामे करायला लावली जातात. या प्रकाराचे व्हिडिओ पुरावे गावकऱ्यांकडे उपलब्ध असून मुलांच्या जीवाशी खेळल्याचा थेट आरोप मुख्याध्यापकांवर होत आहे. शिक्षणाऐवजी मुलांकडून अशा कामांवर भर दिला जाणे ही शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीने या शाळेसाठी सीएसआर फंडातून जवळजवळ दहा लाखांच्यावर निधी गोळा केला आहे. त्यामुळे या शाळेला आधीच्या तुलनेत ग्रामपंचायत विविध स्तरावर सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. पाण्याची टाकी विद्यार्थ्यांना साफ करण्यासाठी सांगण्यात आली होती. ती टाकी जवळजवळ वर्षभर साफ झाली नव्हती, त्यामुळे त्यामध्ये प्रचंड घाण साचली होती. हा प्रकार सरपंचांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांना खाली उतरवून स्वतः ग्रामपंचायत कडून माणसे पाठवून ती टाकी स्वच्छ करून दिली. परिपाठ हा शिक्षणाचा मुख्य भाग आहे, पण त्या वेळेस परिपाठ चालू असताना मुलांकडून अशी कामे करून घेणे योग्य नाही.

मुख्याध्यापकांच्या निष्काळजी कारभारामुळे शाळेतील पटसंख्या झपाट्याने घटत आहे. पालकांचा शाळेवरील विश्वास संपुष्टात येत असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी अशिक्षण आणि अन्यायाचे धडे मिळत आहेत. मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व शिक्षण बुडवणाऱ्या मुख्याध्यापकांवर तातडीने कडक कारवाईची मागणी ग्रामस्थ व पालकांनी गट शिक्षणाधिकारी कुही यांच्याकडे केली असून शिक्षण विभागाने चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

——————————————————————————————————

ग्रामपंचायत गोठणगांवचे सरपंच व पालक या नात्याने मी शाळेच्या भौतिक विकासासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कस देता येईल याकरिता प्रामाणिक प्रयत्न करून CSR फंडातुन आजपर्यंत 10 लाखाच्या वर निधी गोळा केला आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोठणगांव येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना वारंवार शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक सभेत आपल्या शाळेतील गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे आणि मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे याबाबत सूचना देत असतो. गटशिक्षणाधिकारी यांनी महिन्याभरात दोनदा शाळेला भेट देऊन या सर्व बाबीबाबत शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना ताकीद दिली होती. परंतु अजूनही मुख्याध्यापक प्रशासकीय कामाचे कारण समोर करून रोजच 11 वाजेनंतर शाळेत येत असतात. तेव्हा प्रश्न असा पडतो कि, या कामचुकार शिक्षकांना अभय कुणाचे आहे ? शिक्षण विभागाने अशा बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई न केल्यास या सर्व शिक्षकांसाठी शाळेचे दरवाजे कायमचे बंद करून गाववर्गनीतून शाळा सुरु ठेवली जाईल. परंतु अशा प्रकारचा बेजबाबदारपणा, बेवक्तशिरपणा अजिबात सहन केल्या जाणार नाही.

मुकेश मारबते सरपंच गोठनगाव

——————————————————————————————————