तीनशे किलो बनावट पनीर, खवा जप्त ; नागपुरात FDA ची मोठी कारवाई

तीनशे किलो बनावट पनीर, खवा जप्त ; नागपुरात FDA ची मोठी कारवाई

नागपूर : सणासुदीच्या दिवसांत पनीर, पेढा, बर्फी किंवा तत्सम गोड पदार्थांमधील अविभाज्य घटक असलेला खवा जेवणाची लज्जत वाढवितात, हे खरेच. मात्र, तुम्ही या दोन्ही गोष्टी सर्रास कोणाहीकडून विकत घेत असाल तर थोडे सावध व्हा. या दोन्ही वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असू शकते.

शुद्ध पनीरच्या नावे अनलॉग पनीरची विक्री केली जात असल्याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली. त्यानुसार विभागाच्या पथकाने शनिवारी दारोडकर चौक परिसरातील वर्धमान खवा भंडार येथे छापा टाकला. त्यावेळी तिथे २३१ किलो ‘अनलॉग पनीर’ तसेच पोत्यांमध्ये ८२ किलो खवा अस्वच्छ स्थितीत आढळला. त्यानंतर पनीरचा साठा ताबडतोब नष्ट करण्यात आले. अनलॉग पनीर हे पारंपरिक पनीरची नक्कल असलेले एक कृत्रिम उत्पादन आहे. हे पनीर खऱ्या दुधाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च आणि दुधाच्या घन पदार्थांपासून बनवले जाते. हे पनीर दिसायला आणि चवीला खऱ्या पनीरसारखेच असते. परंतु, त्यातील पौष्टिक गुणधर्मांमध्ये फरक असतो. त्यात दुग्धजन्य प्रोटीनऐवजी वनस्पतीजन्य प्रोटीन वापरले जाते.

अनलॉग पनीर निर्मितासाठी रितसर परवाना घ्यावा लागतो. ते खुले विकता येत नाही. खाद्यपदार्थांबाबत स्वच्छतेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. असे असतानाही संबंधित दुकानात विक्रेत्याने पोत्यांमध्ये खवा ठेवला होता. निकृष्ट दर्जाच्या संशयावरून हा चाळीस हजारांचा खवा जप्त करण्यात आला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.