नागपूर ते कुही स्टारबस सेवा सुरू करण्याची मागणी
रोजची धावपळ , अपुरी बससेवा , विद्यार्थ्यांची गैरसोय
कुही – तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व नोकरदार नागरिक दररोज शिक्षण व नोकरीसाठी नागपूरला प्रवास करतात. मात्र अपुरी एसटी बससेवा व खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे नागपूर–कुही मार्गावर तातडीने स्टारबस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दररोज सुमारे १५० विद्यार्थी व अनेक नोकरदार नागपूरला ये-जा करतात. बससेवेच्या कमतरतेमुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो परंतु ती वेळेवर मिळत नाहीत, भाडे जास्त लागते तसेच सुरक्षिततेच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कुही मंडलचे अध्यक्ष व नगरसेवक निखिल येळणे यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. यात दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन अशा चार स्टारबस फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रवास सुलभ, सुरक्षित व स्वस्त होईल.
कुही तालुक्याचे नागपूरवर शिक्षण, रोजगार व वैद्यकीय उपचारांसाठी मोठे अवलंबित्व आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने नागपूर शहरात जातात. बससेवेच्या कमतरतेमुळे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर परिणाम होत असल्याने ही मागणी अधिक जोर धरत आहे. कुही नगरपंचायत व ग्रामस्थांनीही या निवेदनाला पाठिंबा दिला असून पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


