शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू
पंचक्रोशीत हळहळ व्यक्त
कुही :- स्वतःच्या शेतात काम करीत असताना शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सातारा शिवारात मंगळवारी (दि. १) घडली.
त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता कुटुंबीयांसह डॉक्टरांनी व्यक्त केली. इस्तारी बांते (६०, रा. सातारा, ता.कुही) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची याच गावाच्या शिवारात शेती असून, ते मंगळवारी कपाशीच्या पिकाची डवरणी करीत होते, शिवाय दिवसभर उन्हाची तीव्रता अधिक होती. उन्हाचे चटके सहन करीत ते डवरणी करीत असताना थकवा जाणवायला शेतातील झाडाखाली लागल्याने बसले. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी थोडी विश्रांतीही घेतली. काही वेळात त्यांना छातीत वेदना व्हायला सुरुवात झाली आणि शेतातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.