गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांचे तीन दिवसांपासून साखळी उपोषण
तहसील कार्यालयाच्या छतावर चढून वेधले प्रशासनाचे लक्ष
कुही :- गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त मोर्चे व आंदोलन करत आहेत. मात्र तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने मागील तीन दिवसांपासून कुही तहसील कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र तरीही शासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयाच्या दारावर बसून धरणे आंदोलन केले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्त यांच्या तर्फे त्यांच्या प्रलंबित ११ प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून प्रकल्पग्रस्त यांच्या वतीने सौरव आंबोने व अशोक मारबते हे तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करत आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने बुधवारी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित होते. दुपारी 3 वाजता तहसील कार्यालयाच्या दारावर प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरु असल्याने तहसील परिसर दुमदुमले. मात्र यात काही तरुणानी सर्वांची नजर चुकवून तहसील कार्यालयाच्या छतावर चढत घोषणाबाजी केली. यामुळे तहसील कार्यालयाचे वातावरण चांगलेच तापले होते. व इतरही प्रकल्पग्रस्त छतावर चढण्याच्या प्रयत्नात असताना वेळीच कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर व उपपोनी स्वप्नील गोपाले यांनी परिस्थिती नियंत्रनात आणून लोकांना छतावर जाण्यापासून रोखले शिवाय छतावर चढलेल्या लोकांनाही खाली उतरविले. मात्र कितीही समजूत काढूनही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने प्रशासनाची मोठी दमछाक उडाली. विशेष म्हणजे कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे हे एका बैठकीसाठी बाहेर गेले होते. तहसील कार्यालयातील सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालयात पोहचून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन शांत करत आपल्या मागण्यांचे पत्र तहसीलदार यांना दिले. यावेळी प्रामुख्याने जगदीश बांते,आकाश भोयर, क्रिष्णा घोडेस्वार , निखील धानोरकर, सुरेश आम्बोने, शुभम खोब्रागडे, राजहंस माटे, आकाश नरुले सह गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय मंडळींची हजेरी
साखळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यात माजी आमदार राजू पारवे , प्रमोद घरडे, सुधीर पारवे, राजू मेश्राम, संजय मेश्राम आदींनी उपोषण कर्त्यांना भेट दिली. यावेळी राजू पारवे यांनी शासन दरबारी या प्रकरणाची माहिती देत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.