चारचाकी वाहनाची दुचाकीला जबर धडक
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू तर इतर गंभीर जखमी
कुही :- दुचाकीने कार्यक्रमाहून गावी परत जाताना मागून येणाऱ्या चारचाकीने चिपडी नजीक साई राईल मिल जवळ दुचाकी वाहनाला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार दुचाकीसह थेट रस्त्यानजीक नाल्यात जाऊन पडले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अपघातात चारचाकी उलटली असून चारचाकी चालक पोलीस शिपाई हा मद्यधुंद अवस्थेत असून तो सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे.
रविवारी रात्री ९.३० ला कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा-चिपडी नजीक भीषण अपघात झाला असून यात नीलम रामटेके या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृतक नीलम दिनेश रामटेके (वय-३५) रा. वडोदा हि आपल्या परिवारासह कुही तालुक्यातील विरखंडी येथे बहिणीच्या सुनेच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला मुलगी तनु दि. रामटेके , मुलगा तन्मय दि. रामटेके, तनु लेंडे, सुनील लेंडे यांच्यासह दुचाकी पल्सर वाहन क्र. एमएच ४९ सीई ३५१ या वाहनाने आली होती. दरम्यान प्राप्त माहितीनुसार गावी परत जाताना मांढळ ते कुही रस्त्यावर साई राईल मिल जवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर वाहन क्र.एमएच एसी ३७१५ चा चालक अरुण साहेबराव बहाळे, रा. पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण याने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार चक्क वाहनासह रस्त्यानजीकच्या नाल्यात पडले. व अपघातात चारचाकी वाहन उलटून पडले. स्थानिकांनी जखमींना मांढळ कडून कुही कडे येत असलेल्या कुहीचे उपनगराध्यक्ष अमित ठवकर यांच्या गाडीत टाकून कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींची स्थिती पाहता त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले असून त्यातील नीलम दिनेश रामटेके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चारचाकी वाहन चालक पोलीस शिपाई अरुण बहाळे हा आंभोरा येथे एसएसटी पथकात कार्यरत होता. विशेष म्हणजे आरोपी पोलीस शिपाई अरुण बहाळे हा मद्यधुंद अवस्थेत होता. आरोपी वाहनचालक याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवल्याने हा अपघात झाला असून फिर्यादी खिलचंद गणवीर यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.