फसवणूक करणाऱ्या प्रियकराचे बाळ नकोच, प्रेयसीची उच्च न्यायालयात धाव
नागपूर : प्रेमजाळ्यात फसविणे आणि नंतर लग्नाचे अमिष देऊन लैंगिक शोषण करणे, असे प्रकार अलिकडे मोठ्या संख्येत समोर येत आहे. नागपुरात अशाप्रकारचे एक प्रकरण समोर आले. एका तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर बलात्कार केला आणि यातून मुलगी गर्भवती झाली. मुलीने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत फसवणूक करणाऱ्या तरुणाने बाळ नकोच अशी विनवणी न्यायालयाकडे केली.
शहरातील एका अल्पवयीन प्रेयसीने दगाबाज प्रियकराचे बाळ नकोय, असा टाहो फोडत गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. प्रेयसीच्या गर्भात २६ आठवडे ३ दिवसांचे बाळ आहे. प्रेयसी १७ वर्षे वयाची असून, तिच्या पालकांनी गर्भपाताला संमती दिली आहे. परंतु, गर्भपाताच्या नियमानुसार, २४ आठवड्यांपेक्षा जास्त दिवसाचे बाळ असल्यास गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने सोमवारी प्रेयसी व गर्भातील बाळाचे आरोग्य तपासण्याकरिता वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. वैद्यकीय मंडळाने अहवाल सादर करून गर्भपात शक्य आहे की नाही, यावर भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले. प्रकरणावर न्या. नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

पीडित प्रेयसीला तिच्या प्रियकराने प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. तिला लग्न करण्याचे स्वप्न दाखविले होते. दरम्यान, त्याने प्रेयसीचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर प्रियकराने तिला वाऱ्यावर सोडून दिले. आरोपी प्रियकराविरुद्ध राणा प्रतापनगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.


