खर्र्यावरुन मित्रांमध्ये जुंपली ; वाद एवढा वाढला की, एका मित्राला गमवावा लागला जीव
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मा नगरमध्ये खर्रा न दिल्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मृतकाचे नाव साहिल विलास बहिले (वय २४) असून आरोपींची नावे नागेश्वर उर्फ सोनू मसराम आणि राहुल हजारे अशी आहेत. हे तिघेही एकत्रितपणे बलून डेकोरेशनचे काम करायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बहिले याने आपले दोन मित्र नागेश्वर आणि राहुल यांच्याकडे खर्रा मागितला. मात्र दोघांनीही त्याला खर्रा देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणादरम्यान आरोपीच्या हातातील स्टीलच्या कड्याचा जबरदस्त फटका साहिलच्या डोक्याला बसला. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर साहिलने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर तो घराकडे न जाता जवळच एका ठिकाणी झोपून गेला. काही वेळाने त्याचे वडील त्याला शोधत तिथे पोहोचले आणि त्याला घरी घेऊन गेले. साहिल दिवसभर घरी झोपलेला होता, मात्र रात्री त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मेडिकल रुग्णालयातून पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा वाद खर्रा मागण्यावरून झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपी नागेश्वर मसराम आणि राहुल हजारे यांना अटक केली आहे. मात्र, तपासात हे स्पष्ट झाले आहे की ही घटना पूर्वनियोजित नव्हती आणि मृत्यू अपघातीरित्या झाल्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल न करता भारतीय दंड संहितेच्या 304 (अ) म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

