महाल परिसरातील बहुमजली इमारतीतील गोदामाला भीषण आग ; दोघांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर
नागपूर : महाल येथील एका बहुमजली इमारतीतील गोदामाला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत एक जण जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुकानमालक गिरीश खत्री (वय 35), विठ्ठल धोटे (वय 25) अशी मृतकांची नावे असून, गुणवंत दिनकर नागपूरकर (वय 28) असे जखमीचे नाव आहे. या घटनेने महाल परिसरात खळबळ उडाली आहे.
महाल येथील गांधीगेटजवळ जयकमल कॉम्प्लेक्स ही पाच मजली इमारत असून, पहिल्या माळ्यावर गोदाम आहे. या गोदामात लग्न व इतर समारंभात सजावटीचे साहित्य ठेवले होते. यात कोल्ड फायर पायरो, विद्युत दिव्यांच्या माळा, हॅलोजन लाईट व इतर विद्युत साहित्य ठेवले होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पहिल्या माळ्यावरील गोदामात आग लागली. आगीची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान, गोदामात ज्वलनशील साहित्य अधिक असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत गिरीश खत्री, विठ्ठल धोटे, गुणवंत नागपूरकर सापडले. अग्निशमन जवानांनी या तिघांनाही आगीतून बाहेर काढत पाण्याचा मारा केला. आगीत गिरीश खत्री, विठ्ठल धोटे यांचा मृत्यू झाला तर गुणवंत नागपूरकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रात्री दहापर्यंत आगीवर पाण्याचा मारा सुरू होता. आग नियंत्रणात आल्यानंतर दोन अग्निशमनचे बंब घटनास्थळी ठेवण्यात आले. गंजीपेठ, सिव्हिल लाईनसह सहा अग्निशमन केंद्रावरून अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. महाल ही मोठी बाजारपेठ आहे. घटनेदरम्यान आजूबाजूची दुकाने जवळपास बंद झाली होती. काही लोक दुकाने बंद करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी आग लागली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ पोहोचून पाण्याचा मारा केला. एवढेच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही सुरक्षेच्या दृष्टीने दूर करण्यात आले.

