कळमना मार्केटमध्ये किरकोळ वादातून ट्रक चालकाचा खून

कळमना मार्केटमध्ये किरकोळ वादातून ट्रक चालकाचा खून

नागपूर: कळमना मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली असून एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली आहे. किशोर ठाकरे नावाच्या एका व्यक्तीने रवी वाघमारे नावाच्या ट्रक चालकावर चाकूने वार केले. यात रवीचा मृत्यू झाला. पोलिसांनी किशोरला अटक केली आहे. जागेच्या वादातून ही हत्या झाली असून या घटनेनं शहरात चांगलीच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार कळमना मार्केटमध्ये किशोर ठाकरे काही श्रमिकांसोबत बोलत बसला होता. त्यावेळी रवी वाघमारे तिथे आला. रवीने किशोरला तेथे बसण्यावरून जाब विचारला. “तू इथं कशाला बसला, ही माझी जागा, तू येथून उठ,” असं रवी किशोरला म्हणाला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि रागाच्या भरात रवीने किशोरवर चाकूने हल्ला केला. पण किशोरने तो वार हातावर झेलला. त्याने रवीच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर किशोरने रवीवर चाकूने अनेक वार केले. रवी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रवीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथं तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी किशोर ठाकरे याला अटक केली आहे.