नवरदेवाच्या ‘स्टेज’वर ठाण मांडत पैश्यासाठी, तृतीयपंथीयांचा विवाह सोहळ्यात गोंधळ
नागपूर : विवाह सोहळ्याचा मुहूर्त जवळ येत होता. वर-वधूकडील मंडळींची लगबग सुरू होती. विधी सुरू होणार तोच तृतीयपंथीयांचा एक गट लग्न मंडपी दाखल झाला. स्टेजवरच त्यांनी ठाण मांडून पैशांची मागणी केली. पोलिसांना बोलवा आम्ही घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी मोठी रक्कम घेऊनच परतीचा मार्ग धरला.
वाडी परिसरातील एका सभागृहात घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा या समस्याकडे लक्ष वेधण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील हे लग्न होते. त्यांच्यासाठी पाच ते दहा हजार ही रक्कम मोठी आहे. मात्र पाहुण्यांसमोर गोंधळ नको या भीतीपोटी या कुटुंबीयांनी त्यांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतली. स्वच्छने दिले तेवढेच पैसे घ्यावे. अशा मानसिक आणि आर्थिक जाचातून सर्वसामान्यांची सुटका व्हावी, अशी अपेक्षा वर-वधूकडील मंडळींनी व्यक्त केली. कुणी पैशांची मागणी करून धाक दाखवत असेल तर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल होतो, असे असतानाही तृतीयपंथीयांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

स्वेच्छेने पैसे दिले तर काहीच हरकत नाही, मात्र पैशासाठी दबाव टाकायला नको. तृतीय पंथीयांच्या नावाने दमदाटी करून पैसे उकळणारी प्रथा बंद व्हायला हवी. तृतीय पंथीय ओळखायचे कसे? हा प्रश्न आहे. महिलांची वेशभूषा परिधान करून गुंड प्रवृत्तीचे लोकही घरात घुसू शकतात. त्यांच्याकडे तृतीय पंथीयांचे ओळखपत्र नसल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण होते. अनूचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

