गडचिरोलीहून नागपूरला रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
भिवापूर : उमरेड-भिवापूर मार्गावर गोंडबोरी-नवेगाव (दे.) दरम्यान रुग्णवाहिकेला दुपारी अचानक आग लागल्याने मोठा थरारक प्रसंग घडला. वाहनात असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरपैकी एकाचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुदैवाने रुग्णवाहिकेतील रुग्ण व प्रवासी सुखरूप असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रुग्णवाहिका चालक संघशिल कुशाल उंदीरवाडे (वय 30) हा या रुग्णवाहिकेने (एमएच-14/सीएल-0517) गडचिरोलीवरून नागपूरकडे रुग्ण घेऊन जात होता. गोंडबोरीजवळ असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी रुग्णवाहिका वेढली. रुग्णवाहिकेत दोन ऑक्सिजन सिलिंडर होते. यातील एका सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली. प्रसंगावधान राखून चालकाने तातडीने वाहन थांबवले आणि रुग्णासह सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिस हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. परिसरातील नागरिकांनीही आग विझवण्यासाठी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटामुळे वाहन पूर्णतः जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

