मांढळ बाजार समितीत ₹1.66 कोटींचे आधुनिक शेतकरी भवन उभारणार ; शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाचे निर्णायक पाऊल

मांढळ बाजार समितीत ₹1.66 कोटींचे आधुनिक शेतकरी भवन उभारणार ; शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाचे निर्णायक पाऊल

(स्वप्नील खानोरकर – विशेष प्रतिनिधी)

कुही :– तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकऱ्यांसाठी नवे आधुनिक शेतकरी भवन उभारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत ₹1.66 कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.मांढळ बाजार समितीत केवळ कुही तालुक्यातीलच नव्हे तालुक्याबाहेरील आजूबाजूच्या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने दैनंदिन व्यवहारासाठी येतात. मात्र, येथे थांबण्याची योग्य जागा नाही, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची कमतरता, व विश्रांतीसाठी आवश्यक सोयींचा अभाव जाणवतो. तसेच, अनेकदा लिलाव आणि व्यवहार उशिरा होतात, परिणामी शेतकऱ्यांना रात्रीपर्यंत थांबावे लागते पण त्यासाठी कोणतीही निवासाची सोय उपलब्ध नाही.या समस्या लक्षात घेऊन शासनाने शेतकरी भवनासाठी ₹1,66,87,756 इतक्या रकमेचे अंदाजपत्रक दिले असून यासाठी शासनाकडून ₹76.46 लाख म्हणजे 50% अनुदान दोन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीने स्वतःच्या निधीतून किंवा कर्जातून उभारणे बंधनकारक राहील.

भवनात शेतकऱ्यांसाठी थांबण्याची व्यवस्था, आराम कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय, कार्यालयीन सुविधा व माहिती केंद्र असणार आहे. हे बांधकाम प्रशासकीय मान्यतेपासून एक वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. निविदा प्रक्रियेनंतर बांधकामास तांत्रिक मंजुरीनंतरच सुरूवात होईल.या शेतकरी भवनाच्या देखभाल, दैनंदिन खर्च, मनुष्यबळ, वीज व पाणीबिल इत्यादी सर्व खर्च बाजार समितीनेच उचलायचा आहे. शासनाकडून यासाठी कोणताही निधी उपलब्ध केला जाणार नाही.कुही तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असून बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा आणि विश्रांती मिळेल, जे आजवर केवळ स्वप्न वाटत होते.शेतकऱ्यांची ताकद ही देशाची खरी संपत्ती आहे,त्यांची फक्त सोयच नाही तर सन्मान पण व्हायला पाहिजे.नवे शेतकरी भवन केवळ इमारत नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळणारा नवा अधिष्ठान आहे. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल.