अखेर धामणा येथील गुराखीचा मृत्यू: व्याघ्र हल्ल्यानंतर अखेरचा श्वास; धामणा-चिकना परिसरात दहशतीचं सावट

धामणा येथील गुराखीचा मृत्यू

व्याघ्र हल्ल्यानंतर अखेरचा श्वास; धामणा-चिकना परिसरात दहशतीचं सावट

कुही : वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष देवराव मांढरे (वय ५३, रा. धामणा) यांचे बुधवारी, ९ जुलै रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या १२–१३ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या मांढरे यांची प्राणज्योत अखेर मालवली. या घटनेमुळे संपूर्ण धामणा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

२७ जून रोजी दुपारी मामा तलावाजवळ गाई चारत असताना वाघाने मांढरे यांच्यावर झडप घातली होती. डोक्याला, खांद्याला आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या होत्या. आरडाओरड करून गावकऱ्यांनी वाघाला पळवले, मात्र तोपर्यंत मांढरे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आले, पण उपचार निष्फळ ठरले व आज नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे अखेरचा श्वास घेतला.