चिचघाट वासियांचा ठाम इशारा : ५०० नव्हे, प्रत्येकी २५०० चौ.फुट भूखंड व २० लाख मोबदला हवा..
( स्वप्नील खानोरकर )
कुही :– वारंवार येणाऱ्या पुरामुळे उद्ध्वस्त होत असलेल्या चिचघाट गावाच्या पुनर्वसनासाठी १६ जुलै बुधावारला एका महत्त्वाच्या वळणावर ग्रामस्थांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशावरून चिचघाट पुनर्वसन स्थळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत, ग्रामस्थांनी २५०० चौ.फुट भूखंड व २० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची जोरदार मागणी केली.

मौजा चापेगडी येथे झालेल्या या विशेष ग्रामसभेत उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण (उमरेड), तहसीलदार डॉ. अमित घाटगे (कुही), गटविकास अधिकारी डॉ. स्वप्नील मेश्राम, मंडळ अधिकारी गिरडकर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामसभेत १४ ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय वाचून दाखवण्यात आला. त्यानुसार, पुनर्वसनात ५०० चौ.फुट जागा देण्याचे प्रस्तावित होते. मात्र, ग्रामस्थांनी हे साफ नाकारत, ५०० चौ.फुटमध्ये उदरनिर्वाह, बैलगोठा, शेती साहित्य साठवण, पशुपालन अशक्य असल्याचे ठणकावले.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी गावात महापुराचे थैमान होते. घरांची पडझड, जनावरांचे हाल आणि शेतीचे नुकसान या सर्वांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत. तेथील घरे बेटावरसारखे झाले, उद्या काही जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांपुढे मांडला.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. भारती मांढरे होत्या. माजी जि.प. सदस्य अरुणजी हटवार, माजी उपसभापती इस्तरी तळेकर, उपसरपंच लालकृष्ण जोंजाळ, ग्रामसेवक ठाकरे, तलाठी सायाम मॅडम, सदस्य जैरामजी शेंद्रे, अॅड. थोटे, माजी सदस्य विठोबाजी मुंडले, पोलीस पाटील सौ. आरती गभने, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गावकऱ्यांना त्यांच्या गरजांनुसार सन्मानाने आणि न्यायाने वागणूक मिळावी यासाठी चिचघाट ग्रामस्थांनी दिलेला हा आवाज शासन यंत्रणांना विचार करायला भाग पाडणारा आहे.
