वाघाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी ; परिसरात भीतीचे वातावरण
निखील खराबे
कुही :- तालुक्यातील मौजा-भिवकुंड येथे घरच्या पाळीव प्राण्यांसाठी चारा आणायला जात असलेल्या इसमावर वाघाने मागून झडप घातली. या हल्ल्यात इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कुही येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गुरुवारी (दि.२४जुलै) तालुक्यातील भिवखुंड येथील किशोर भगवान बांगडकर (वय-४२) हे सकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या घरच्या पाळीव जनावरांसाठी चारा आणायला जात होते. दरम्यान रोडच्या कडेला दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून झडप घातली. यात किशोर हे जागीच पडले. अचानक झालेल्या हल्ल्याने ते घाबरून गेले व आरडाओरडा केला. त्यांच्या आरडाओरडा केल्याने वाघ तिथून निघून गेला. मात्र काही वेळातच वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले किशोर बेशुद्ध होऊन तीथेच पडून राहिले. ही घटना चापेगडी-राजोला रोड नजीक असल्याने रस्त्याने जात असलेल्या भिवकुंड येथीलच प्रमोद मेश्राम नामक व्यक्तीला किशोर बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. तो किशोर यांना गावात घेऊन आला व कुही येथील चैतन्य हॉस्पिटल येथे दाखल केले. घटनेची माहिती मिळतात वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तसा पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या टीमने घटनास्थळी पाहनी केली असता वाघाचे पगमार्ग दिसून आले नाही. त्यामुळे हल्ला करणारा प्राणी वाघच आहे का.? याबाबत वनविभाग संभ्रमात आहे. त्यात मिळालेल्या माहितीनुसार या घटनेच्या एक दिवसा अगोदरच प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रात वाघाने भिवकुंड येथील एका व्यक्तीच्या शेळीची शिकार केली होती. तर शुक्रवारी पुन्हा भिवकुंड नजीक सायंकाळच्या सुमारास काहींना वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे गावात भीतीचे वातवरन निर्माण झाले असून वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे.
तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच संरक्षित वन लगत असलेल्या तालुक्यातील धानला येथील गुराख्यावर वाघाने हल्ला चढवून जखमी केले होते. त्यात उपचारादरम्यान गुराख्याच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याच घटनेची पुनरावृत्ती भिवकुंड येथे झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा रोष पाहायला मिळत आहे. भिवकुंड येथील घटनेनंतर प्रादेशिक वनविभागातर्फे पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. तर आजूबाजूच्या गावात जनजागृती करण्यात आली आहे.
