पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
नागपूर : हिंगणा तालुक्यातील सलाईमेंढा तलावात शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एका २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाचे नाव पियुष सूरज सुखदेवे (रा. भिलगाव, ता. कामठी) असे आहे. तो शनिवारी सकाळी आपल्या चार मित्रांसोबत सहलीसाठी सलाईमेंढा तलावाकडे गेला होता. मात्र ही सहल त्याच्या आयुष्यातील शेवटची ठरली.
पियुषसोबत, मृणाल विमेश उके (२०) व हर्ष सिद्धार्थ थुलकर (१९) दोघेही रा. कपिलनगर, नागपूर, करण लक्ष्मण चौधरी (१८) रा. बाराखोली, जरीपटका आणि क्रिश प्रकाश स्वामी (१९) रा. मोतीबाग रेल्वे क्वार्टर हे सर्व मित्र ट्रिपसाठी गेले होते. शनिवारचा सुट्टीचा दिवस असल्याने त्यांनी सहलीला जाण्याचे ठरवले होते. सकाळी ९:३० च्या सुमारास ते सलाईमेंढा तलावाजवळ पोहोचले व काही वेळ पार्टी केल्यानंतर अंघोळीसाठी पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पियुष आणि त्याचा एक मित्र खोल पाण्यात बुडू लागले. यातील एका मित्राला पोहता येत असल्याने त्याने इतर दोघांना वाचवले, मात्र पियुष खोल पाण्यात गायब झाला. घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वानाडोंगरी व नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक व पाच प्रशिक्षित गोताखोर घटनास्थळी दाखल झाले. बोटच्या साहाय्याने सुमारे तीन ते चार तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी तीनच्या सुमारास पियुषचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह हिंगणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


