मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन 8 वर्षीय बालकांचा दुर्दैवी मृत्यू

मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन 8 वर्षीय बालकांचा दुर्दैवी मृत्यू

रामटेक : खेळता-खेळता खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन आठ वर्षीय मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमसर मार्गावरील बिजेवाड्यातील पाचगाव परिसरात घडली आहे. उत्कर्ष लोकेश लांजेवार (वय वर्ष 8) आणि रेहान संजय सहारे (वय वर्ष 8, दोन्ही राहणार पाचगाव ) अशी मृतकांची नावं आहेत.

शनिवारी(26 जुलै)दुपारी 2 वाजताच्या सुमारास हे आठ वर्षांचे दोन चिमुरडे, घरापासून 150 मीटर अंतरावर खेळायला गेले. खेळता खेळता दोघेही मुरूम काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडले. त्यातच खड्ड्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळ झाल्यानंतरही दोघे घरी परतले नाही. त्यामुळे पालक आणि नातेवाइकांनी दोघांचाही शोध सुरू केला. तेव्हा मुरूम काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याजवळ या दोघांच्याही चपला नातेवाइकांना दिसल्या. पोहणारे पाण्यात उतरले असता दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या अंगावर आढळून आले

दरम्यान, एका नागरिकाने रामटेक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तात्काल घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. रविवारी (27 जुलै) दुपारी दोघांच्याही पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही नातेवाइक होते. उत्कर्ष आणि रेहानच्या मृत्यूने लांजेवार व सहारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाइक शोकमग्न असून गावात शोककळा पसरली आहे.