दारुच्या घोटासह सुट्टीच्या दिवशी पेपर्सवर सह्या ; बारमध्ये बसून प्रशासकीय कामकाजाचा नीपटारा
नागपूर : नागपूरमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरमधील एका बारमध्ये प्रशासकीय फाईल समोर ठेवून काम सुरु असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय कामाकाजासाठी बारचा वापर होत असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे. नागपूरमधील मनिषनगरमधील हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. दुपारच्या सुमारास बिअर बारमध्ये दारुचे घोट घेत आणि प्रशासकीय फाईल समोर ठेवून सह्या केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बारमध्ये एका टेबलवर तीन माणसं बसली आहेत. त्यातील एक जण प्रशासकीय फाईल पडताळत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ हा रविवारचा असून सुट्टीच्या दिवशी बिअर बारमधून शासन कारभार सुरु असल्याची टीका आता समाजमाध्यमांवर केली जात आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले लोक दिसत आहेत. हे लोक नक्की अधिकारी आहेत का आणि कोणत्या विभागाचे अधिकारी आहे असे प्रश्न आता निर्माण होत आहे. त्याचबरोबर हे लोक दारुचे घोट घेत फाईलींवर सह्या देखील करत आहेत. त्यामुळे दारुच्या नशेमध्ये कोणत्या फाईलीवर सह्या करण्यात आला आहे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येताना तीन लोकांची सोबत फाईलचा गठ्ठा आणला होता. त्यानंतर दारुची ऑर्डर देत हा फाईल्सचा गठ्ठा चाळला. यामुळे प्रशासकीय कार्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच समाज माध्यमांवरुन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

नागपूरमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत कारवाईला सुरुवात केली आहे. बिअर बारमधील सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांकडून तपासले जात आहे. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर बिअरबारमध्ये कोणते अधिकारी होते आणि नशेमध्ये त्यांनी कोणत्या फाईंलवर सह्या केल्या आहेत याची माहिती समोर येऊ शकेल. यानंतर सरकार आणि पोलीस कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
