मांढळला नगर पंचायतीचा दर्जा द्या ; राजू पारवे यांचे महसूलमंत्र्यांकडे निवेदन…

मांढळला नगर पंचायतीचा दर्जा द्या ; राजू पारवे यांचे महसूलमंत्र्यांकडे निवेदन…

स्वप्नील खानोरकर

कुही :तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मांढळ गावाला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा अशी ठाम आणि जोरदार मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा उमरेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू पारवे यांनी राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

या निवेदनात मांढळ गावाची १७००० लोकसंख्येची ताकद, सक्रिय बाजार समिती, आणि उद्योग-व्यवसायाचे केंद्र असल्याचा उल्लेख करत, ग्रामपंचायतीच्या मर्यादांमुळे विकासाला खिंडार बसत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. १७ सदस्यांची प्रभावशाली ग्रामपंचायत मंडळरचना असलेल्या मांढळला नगर पंचायतीचा दर्जा दिला गेला तर गावाचा सर्वांगीण विकास वेगाने साधता येईल, असे पारवे यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी मांढळला आले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या या गावाला नगर पंचायतीचा दर्जा दिला जाईल असे ठाम आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत ते आश्वासन केवळ भाषणातच राहिले असून, शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मांढळ ग्रामपंचायतीचा तालुक्यात क्रमांक एकचा दर्जा असून हा भाग नागपूर ग्रामीणमधील एक उदयोन्मुख शहरी केंद्र म्हणून ओळखला जातो. मात्र नगर पंचायतीचा दर्जा नसल्याने शासनाच्या योजनांचा लाभ पूर्णतः मिळत नाही, परिणामी विकासकामे रखडली आहेत. मांढळला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला, तर निधीचा प्रवाह सुरू होईल, शासकीय यंत्रणा सक्षम होईल आणि गावाचा चेहरामोहरा बदलून जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासनही पूर्ण होईल.