महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी होणार ? राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे की या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच सगळ्या भागांमध्ये एकाच वेळी निवडणुका न घेता वेगवेगळ्या टप्प्यांत घेतल्या जातील. याव्यतिरिक्त या निवडणुकांमध्ये VVPAT (मतदान यंत्राला जोडलेली पर्ची दाखवणारी यंत्रणा) वापरण्यात येणार नाही. त्यामुळे मतदाराने दिलेला मत यंत्राद्वारेच नोंदवला जाईल, पण त्याची पावती मिळणार नाही. आयोगाने यामागचे कारण तांत्रिक आणि प्रशासनिक सोयीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच या निवडणूका कधी होणार हे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Municipal Elections 2025) ची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर सुरू होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आज नाशिक (नाशिक न्यूज) विभागात येणाऱ्या निवडणुकांबाबत आढावा बैठक झाली, यावेळी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने आखले जाईल. सर्व निवडणुका एकत्रित केल्याने मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त, कोणत्या संस्थेची निवडणूक आधी घ्यायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी-एसटी आरक्षण निश्चित आहे, परंतु ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाईल. “ओबीसी आरक्षण फक्त मागील निवडणुकांमध्येच होते आणि यावेळीही तेच तत्व पाळले जाईल.”



