वीज पडून शेतकरी मायलेकाचा मृत्यू, वग शिवारात दुर्दैवी घटना

वीज पडून शेतकरी मायलेकाचा मृत्यू, वग शिवारात दुर्दैवी घटना

कुही : तालुक्यातील वग शिवारात विज पडून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शेतात कपाशीवर फवारणी करण्यासाठी गेलेल्या मेश्राम कुटुंबावर आकाशातून अचानक वीज कोसळली आणि यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आज दुपारी ३.३० च्या दरम्यान घडली. दशरथ नागोजी मेश्राम वय ५०, रा.वग हे आपल्या कुटुंबासह शेतात फवारणीसाठी गेले होते. त्यांच्या समवेत पत्नी सुनिता दशरथ मेश्राम वय ४० आणि दोन मुले धम्मशील मेश्राम वय २१ व धम्मदिप मेश्राम होते. फवारणी करून झाल्यावर सर्वजण परतीच्या वाटेवर असताना आकाशात अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.याच दरम्यान वग ते रुयाड रोडवरून घरी येत असताना अचानक वीज पडली. यात सुनिता मेश्राम आणि त्यांचा मोठा मुलगा धम्मशील मेश्राम यांना तीव्र इजा झाली. गावातील गणेश तितरमारे आणि हर्षल देशमुख यांनी तत्काळ जखमींना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्राथमिक तपासणीनंतर दोघांनाही कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुनिता मेश्राम आणि धम्मशील मेश्राम यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.