पट्टेदार वाघाने केली बैलाची शिकार
साकोली : वनपरिक्षेत्र लाखनी येथील सहवनक्षेत्र जांभळी अंतर्गत येणार्या जांभळी/सडक येथील सोमा बुधाजी पाथरीकर (६२) यांच्या मालकीचा बैल सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास चराईसाठी नेणे असता पट्टेदार वाघाने बैलाला ठार केल्याची घटना जंगल परिसरात घडली. यात पशुपालकाचे अंदाजे ५५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
जांभळी येथील पशुपालक सोमा पाथरीकर यांनी आपल्या मालकीचे पाळीच जनावरे वनविभागाच्या कक्ष क्रमांक- १८५ मधील जंगलात सकाळी चराईसाठी नेले असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्या बैलाचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला करून ठार केले. झालेल्या घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली. पशुपालक सोमा पाथरीकर व गावकरी यांचा समोर घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला. गावकर्यांनी अल्पभूधारक पशुपालक यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
वाघाचे वास्तव्य असल्याने गावकरी लोकांनी जंगलाला लागून असलेले शेतशिवार व जंगल भागात काही दिवस जाणे टाळावे तसेच शेतशिवारात जातांना सावधानी बाळगावी. तसेच जनावरे खुल्या मैदानात चराई करीता न्यावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.



