चालत्या कारला अचानक भीषण आग ; २ मुलांसह पती पत्नी बचावले

चालत्या कारला अचानक भीषण आग ; २ मुलांसह पती पत्नी बचावले

नागपूर : एका धावत्या कारला अचानक आग लागल्याने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. सुदैवाने, कारमध्ये बसलेल्या एका कुटुंबातील सर्व सदस्यांनी वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. ही घटना नागपूरमधील जयताला रोडवरील आहे.

हरीश पांडे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत गणेश उत्सव पाहण्यासाठी कारने जात होते. अचानक, कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला आणि विचित्र वास येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पांडे यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि कुटुंबाला बाहेर काढले. काही सेकंदातच कारने पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. वेळीच कारबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कुटुंबातील सदस्य सुरक्षित असले तरी या अचानक घडलेल्या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.