अवघ्या ४ तासात गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४ आरोपी अटकेत
तो खून प्रॉपर्टीच्या वादातूनच
कुही: – प्रॉपर्टीच्या वादातून नागपूर येथील एका प्रॉपर्टी डीलरची कुही पोलीस स्टेशन हद्दीत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी सुमारे 9 वाजता मृतक घरजाळे हे आपल्या नातेवाइकच्या अंत्यसंस्कारासाठी दुचाकीने मौजा कुसुंबी येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यात त्यांचा धारदार शस्त्राने खून करून आरोपी पसार झाल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच केवळ 12 तासांच्या आत चार आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मृतकाचा भाचा देखील सहभागी आहे आणि तोच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 9 वाजता मृतक देवराव शामरावजी घरजळे (55), रा. शिवांगी नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर हे आपल्या नातेवाइक नारायण भेंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मौजा कुसुंबी येथे जाण्यासाठी दुचाकी क्र. MH-49/W-4889 ने निघाले होते. थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून समजले की उमरगाव – पांढरकवडा मार्गाच्या वळणावर देवराव घरजळे यांचा मृतदेह पडला आहे. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्रांचे खोल वार आढळले. गळाही अर्धवट कापलेला होता, उजवे डोळे पाडले होते, तसेच डोके, चेहरा, कान, दोन्ही खांदे, छाती, पोट आणि पाठ यावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले होते. या भीषण हल्ल्यात घरजळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली .
आरोपी अज्ञात असल्याने मा. वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कुही पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या ४ तासात गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४ आरोपी नामे अंकित संजय येळणे, वय २६ वर्षे, रा. पिपळा, हुडकेश्वर, मुक्तेश्वर ज्ञानेश्वर मेश्राम, वय ३८ वर्षे रा. दुबेनगर, पिंपळा, हुडकेश्वर नागपूर,गजानन नामदेवराव कडू वय ३८ वर्षे, रा. पिपळा हुडकेश्वर, गणेश गंगाराम हुड, वय ३८ वर्षे, रा. दुधाळा तह. मौदा जि. नागपूर यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न केले. आरोपींना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपी नामे अंकित संजय येळणे हा मृतकाचा नातेवाईक असुन त्याने प्रॉपर्टीच्या वादातुन त्याने त्याचा मित्र मुक्तेश्वर ज्ञानेश्वर मेश्राम याला सदर खुन करण्यासाठी सांगितले होते. विशेष म्हणजे अंकित येळणे याला माहीत होते की, मृतक हे मौजा कुसूंबी येथे जाणार आहे. त्यामुळे त्याने मुक्तेश्वर आणि गणेश हुड यांना पोलीस स्टेशन कुही अंतर्गत उमरगाव ते पांढरकवडा रोडवरील टर्निंग जवळ नेवुन सोडले. मृतक नामे देवराव शामराव घरजाळे घराबाहेर पडल्याची माहीती गजानन नामदेव कडु याने आरोपीतांना दिली. मुक्तेश्वर आणि गणेश यांनी धारदार चाकुने वार करून मृतकाचा खुन केल्याची माहीती प्राप्त झाली. सदर आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन कुहीला हस्तांतरीत केले आहे. दरम्यान, झटापटीत आरोपी मुक्तेश्वर मेश्राम जखमी झाला असून सध्या नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, मृतक घरजळे यांचा आरोपी अंकित संजय येळणे हा पुतण्या आहे. घरजळे हे प्रॉपर्टी डिलिंग व्यवसायात भागीदार होते. त्याशिवाय ते न्यू नागपूर महिला ग्रामीण विकास सह. पतसंस्थेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मृतक आणि अंकित यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. आणि त्यातूनच हे घडल्याचे बोलले जात आहे.


