स्कूलव्हॅन अन् स्कूलबसचा भीषण अपघातात विद्यार्थिनीसह चालक ठार, 8 विद्यार्थी जखमी

स्कूलव्हॅन अन् स्कूलबसचा भीषण अपघातात विद्यार्थिनीसह चालक ठार, 8 विद्यार्थी जखमी

नागपूर : स्कूलबस आणि स्कूलव्हॅनची एकमेकांना जबर धडक बसून झालेल्या अपघातात व्हॅनचा चालक व त्यातीलच विद्यार्थिनी असे दोघे जण ठार झाले. तर सहा विद्यार्थी जखमी झाले. ही थरारक घटना मानकापूर उड्डाणपुलावर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हॅन चकनाचर झाली. मृतांमध्ये ऋतिक कनोजिया (२४) हा स्कूलव्हॅनचालक तसेच सान्वी खोब्रागडे (१४) या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कनोजियाची स्कूलव्हॅन कोराडी रोड शाखेच्या भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिरच्या नऊ विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. समोरून नारायणा विद्यालयाची स्कूलबस येत होती. व्हॅन व बस एकमेकींवर धडकल्या. ही बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जात होती. त्यामुळे या बसमध्ये चालक आणि दोन महिला परिचारिकाच होत्या. या तिघांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, व्हॅनचा चालक कनोजिया आणि त्याच्या मागे बसलेली सान्वी दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेने व्हॅनमधील इतर जखमी विद्यार्थी हादरले, रडू लागले. काही बेशुद्ध पडले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आपली वाहने थांबवून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. केबिनमध्ये फसलेल्या कनोजियाला बाहेर काढताना बरेच प्रयत्न करावे लागले. नागरिकांनी व्हॅनच्या काचा फोडून काही बेशुद्ध मुलांना उचलले व नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. कनोजियाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोट आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, बेशुद्धावस्थेतील सान्वीला एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ‘तिच्या श्रोणीला (पेल्विक) फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिची मुख्य रक्तवाहिनी फाटली होती. सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही’, असे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी सान्वीचा मृत्यू झाला.