संध्याकाळी खेळायला गेली लेक घरी परतलीच नाही

नाल्यात बडून ६ वर्षिय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. न्यू येरखेडा परिसरात खेळायला गेलेल्या सहा वर्षीय क्रिस्तीना अमित मरकाम हिचा नाल्यात मृतदेह सापडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 24 तास चाललेल्या अथक शोधमोहीमेअंती पोलिसांनी मृतदेह शोधून काढला. मात्र निरागस जीव गमावल्यानं नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्तीना शुक्रवारी संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. परंतु रात्री सात वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे तिची आई मनीषा मरकाम यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने पथके तयार केली. श्वानपथक, तांत्रिक पथक तसेच विशेष तपास पथकांचा समावेश करून शोधमोहीम हाती घेण्यात आली. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, क्रिस्तीना नाल्याच्या दिशेने जाताना दिसली. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी नाक्याजवळ शोध सुरू केला. अग्निशमन दल व गोताखोरांच्या मदतीने नाल्यात शोध घेण्यात आला. अखेर काही अंतरावर क्रिस्तीनाचा मृतदेह सापडला. आपल्या लेकीचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.







