एमबीबीएस शिक्षणासाठी निवडीने गावाचा मान उंचावला
वेलतुरातील कारेमोरे भगिनींचा सत्कार
कुही : ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सातत्याने शिक्षणात नवे यश संपादन करीत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे वेलतूर येथील कारेमोरे भगिनी. डॉ. सौ. मिनाक्षीताई कारेमोरे व त्र्यंबकजी कारेमोरे यांच्या सुकन्या कु. अदिती कारेमोरे आणि कु. अवंती कारेमोरे यांची यंदाचा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

अदिती आणि अवंती यांचे यश केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करून समाजसेवेत मोठा वाटा उचलावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. मुलींच्या यशामागे आई-वडिलांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन व शिस्तबद्ध अभ्यासाचा मोलाचा वाटा असल्याचेही गौरवोद्गार काढण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, माजी सरपंच किसन खोब्रागडे, तालुका काँग्रेसचे सचिव हरिदास लुटे, उपाध्यक्ष बालू आंबोने, माजी उपसरपंच प्रशांत तितरमारे, राजु चौधरी, उमेश महाकाळकर, शैलेश मेश्राम, नरेश दुधपचारे, पिंटू शेंडे, सुकराम तितरमारे सह आदी मान्यवर उपस्थित होते.








