घरगुती वादातून सासऱ्याचा निर्घृण खून
परसोडी राजा शिवारात जावयाने खून करण्याचा संतापजनक प्रकार
कुही : – तालुक्यातील परसोडी राजा शिवारात सख्ख्या जावयाने आपल्या सासऱ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. जुन्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
देवराव बळीराम ठाकरे (वय ६३ वर्षे) रा. परसोडी राजा, ता. कुही, जि. नागपूर) असे मृतक सासर्याचे नाव आहे. मृतक हे आज बुधवारला,( दि. ०१ ऑक्टोबर २०२५) सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान परसोडी शिवारातील घोडमारे यांच्या शेतात गवत कापण्याच्या कामासाठी गेले होते. ते एकटेच शेतात असल्याची संधी साधत, त्यांच्या मागोमाग गेलेल्या त्यांच्या जावई विलास चमरूजी कोलते (रा. तांडा, ता. मौदा, जि. नागपूर, हल्ली मुक्काम परसोडी राजा, ता. कुही) याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात देवराव गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.



