काही दिवसांपासून मानसिक तणावात ; विवंचनेतून टोकाचं पाऊल, AIIMS मध्ये CRPF उप महानिरीक्षकाच्या लेकीनं आयुष्य संपवलं
नागपूर : नागपूरच्या प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) मध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळाला हादरवून सोडलं आहे. पुण्यात कार्यरत असलेले सीआरपीएफचे डीआयजी (DIG) तथा IPS अधिकारी कृष्णकांत पांडे यांची 25 वर्षीय मुलगी, समृद्धी कृष्णकांत पांडे हिने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. समृद्धी ही एम्स नागपूरच्या त्वचारोग विभागातील पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना काल बुधवारी रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. समृद्धी नागपूरच्या शिव कैलाश येथील मंजीरा अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचे वडील कृष्णकांत पांडे यांनी तिला बराच वेळ फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला तिच्या फ्लॅटवर जाऊन संपर्क साधण्यास सांगितलं. तिची मैत्रीण फ्लॅटवर पोहोचल्यावर दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर मागील दरवाजातून आत प्रवेश केला असता समृद्धीने पंख्याला गळफास घेतल्याचं तिला दिसून आलं. यानंतर तात्काळ सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

प्राथमिक चौकशीत समृद्धी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून समृद्धीच्या मैत्रिणी व प्राध्यापकांकडून चौकशी सुरू आहे. एम्स नागपूरच्या परिसरात या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. समृद्धी ही आपल्या वर्ग मैत्रिणी आणि प्राध्यापकांमध्ये अत्यंत विनम्र, समजूतदार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.








