लेकाचा पहिलाच वाढदिवस ; हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर देवून परतताना युवकाला भररस्त्यात संपवलं
नागपूर : मुलाच्या वाढदिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी चौक परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू (वय 40 रा. शाहू मोहल्ला, वृंदावननगर) असं मृताचं नाव आहे. ते भंगारचा व्यवसाय करायचे.
प्राप्त माहितीनुसार, आज शनिवारी सचिन यांचा मुलगा प्रीत याचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी सायंकाळी परिसरातील नातेवाइक व मुलांसाठी पार्टीचे आयोजन केले. सकाळी सचिन हे भाजपच्या बैठकीतही सहभागी झाले. दुपारी 2 वाजताच्या सुमारास विटा भट्टी चौकातील हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन ते दुचाकी वाहनाने घरी जात होते. काही अंतरावर दोन दुचाकींवर चार युवक आले. त्यांनी सचिन यांना अडविले. दोघांनी धारदार शस्त्रांनी सचिन यांच्या शरीरावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सचिन खाली कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

गणेशोत्सवादरम्यान परिसरात राहणारा सोनू नावाचा युवक मंडपात यायचा. मांसाहार करून आल्याचेही तो सांगायचा. त्यामुळे सचिन यांनी सोनू याला फटकारले. सचिन यांनी फटकारल्याने सोनू संतापला. त्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सचिन यांच्या घरावर हल्ला केला. सचिन व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. सचिन यांनी यशोधरानगर पोलिसांत तक्रार केली. परंतु पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सचिन यांनी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनूविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. तेव्हापासून सोनू हा संतापला होता. पोलिसांत तक्रार केल्यानेच सोनूने साथीदारांच्या मदतीने सचिनची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.







