पार्टीत जबरदस्तीने दारु पाजली ; घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये हवाई सुंदरीसोबत अत्त्याचार

पार्टीत जबरदस्तीने दारु पाजली ; घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये हवाई सुंदरीसोबत अत्त्याचार

नागपूर : वर्धा मार्गावरील सोनेगाव पोलिस स्टेशनसमोरील डाबो पबमध्ये पार्टीदरम्यान दारू पाजून युवकाने हवाई सुंदरीवर कारमध्ये अत्त्याचार केला. आक्षेपार्ह छायाचित्र काढून तिचे वारंवार शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुभम मोहन मेहनडोले (वय ३१, रा. वॉर्ड क्रमांक १६, सावनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. २१ वर्षीय हवाई सुंदरीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, २७ एप्रिलला या तरुणीला मैत्रिणीने पार्टीसाठी डाबोमध्ये जायचे असल्याचे सांगितले. यावेळी मैत्रिणीचा रितेश नावाचा मित्र व शुभमही सोबत असेल, असे ती म्हणाली. त्यानंतर चौघेही मध्यरात्री कारने डाबो येथे गेले. तेथे त्यांनी पार्टी केली. शुभमने तरुणीला दारू पाजली. त्यामुळे तरुणीची प्रकृती खालावली. तिला उलटीही झाली. त्यानंतर चौघेही कारमध्ये बसले. मागील सीटवर शुभम व तरुणी बसले. तरुणीची शुद्ध हरपली होती. यादरम्यान शुभमने तिच्याशी अश्लील चाळे केले. पार्किंगमध्ये कोणी बघेल, या भीतीने त्याने तिला सोडले. रितेश हा कार घेऊन पिपळा डाकबंगला परिसरात आला. तरुणीची मैत्रीण व रितेश यांनी ढाब्यावर कार थांबवली. शुभम व तरुणी कारमध्येच होते. शुभमने तरुणीवर बलात्कार केला. मोबाइलद्वारे तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. दोघेही परतले. दोघांनी तरुणी व तिच्या मैत्रिणीला घरी सोडले. दुसऱ्या दिवशी शुभमने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझी आक्षेपार्ह छायाचित्रे माझ्याकडे आहेत’, असे सांगत तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वारंवार तिचे शारीरिक शोषण करायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच  तरुणीने सोनेगाव पोलिस ठाणे गाठले. प्रकरण खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तरुणीला खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले. तरुणीने खापरखेडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शुभमचा शोध सुरू केला आहे.