कुही तालुक्यात वाघांचा संचार वाढला ; मोहदरा शिवारात गाईची शिकार

कुही तालुक्यात वाघांचा संचार वाढला ; मोहदरा शिवारात गाईची शिकार

निखील खराबे

कुही :- तालुक्यात वाघांच्या संचारात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दि. १५ नोव्हेंबरच्या रात्री मोहदरा शिवारात वाघाने हल्ला चढवत शेतकरी विकास नीलकंठ भुजाडे यांच्या गाईची शिकार केली. या हल्ल्यात भुजाडे यांचे अंदाजे ९० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मोहदरा गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भुजाडे यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ते गाय आणि दोन बैल शेतात बांधून घरी परतले. मात्र रविवारी सकाळी ते शेतात गेले असता गाय शेतात दिसली नाही. परिसरात शोध घेतल्यावर काही अंतरावर गाय मृतावस्थेत सापडली असून तिच्यावर स्पष्टपणे वाघाच्या हल्ल्याच्या खुणा आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. ग्रामीणांनी तत्काळ वनविभागाला कळविले. मोहदरा शिवारातील ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, लगतच्या सोनपुरी शिवारातही वाघाने एका पाळीव जनावराची शिकार केली होती. सलग दोन घटनांमुळे वाघ या परिसरातच फिरत असल्याची शक्यता अधिक बळावली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतातील कामांवर अडथळे

सध्या धान कापणी, कापूस वेचणी आणि रबी पेरणीची महत्त्वाची शेतीकामे सुरू असताना वाघाच्या हल्ल्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून शेतीची कामे लांबली जात आहे. तर वाघाचा वावर असल्याच्या चर्चा असल्याने शेतात काम करायला मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतातातील कामे करायची कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे येऊन पडला आहे.

शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी

परिसरातील शेतकरी व नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवावेत, गाव परिसरात नियमित गस्त वाढवावी, पीडित शेतकऱ्याला तातडीची नुकसानभरपाई द्यावी, वाघाला सुरक्षितपणे जंगलात हलविण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहे. शेतकरी वर्ग आधीच हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांच्या तणावाखाली असताना वाघांचा वाढता वावर ही नवी चिंतेची बाब ठरत आहे.

तर ४ दिवसाआधी तालुक्यातील नागपूर शहरालगत असलेल्या कुचाडी शिवारात सुद्धा एका पाळीव जनावराला जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने गस्त वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.