धावत्या बसला अचानक आग ; चालकाचा निर्णयाने मोठा अनर्थ टळला, 50 प्रवासी बचावले
नागपूर : नागपूर-उमरेड महामार्गावर रविवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने काही क्षणासाठी घटनास्थळी भीती पसरली होती. मात्र, चालकाच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 40 ते 50 प्रवाशांचे प्राण बचावले. ही घटना दुपारच्या सुमारास चक्री घाटाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बस उमरेड येथून नागपूरकडे येत होती. प्रवास सुरळीत सुरू असतानाच बस चालकाचं लक्ष इंजिनमधून निघणाऱ्या धुराकडे गेलं. काहीतरी बिघाड झाल्याची शंका येताच चालकाने लगेच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर त्याने प्रवाशांना तात्काळ बसमधून खाली उतरण्यास सांगितलं. त्याच्या यावेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी बाहेर पडताच काही मिनिटांत आगीचे लोटांनी संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतलं. काहीजणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर बस क्षणार्धात ज्वाळांनी वेढली गेली. अखेर काही वेळातच संपूर्ण बस राख झाली.

घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस आणि अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, आग एवढी भीषण होती की बसचे फक्त सांगाडे शिल्लक राहिले. प्राथमिक तपासानुसार बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. तांत्रिक तपास सुरू असून बसमधील विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड का झाला? याचा शोध घेतला जात आहे.







