कुही तालुक्यात जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीची चाहूल
इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात; गावागावात राजकीय तापमान चढू लागलं
निखिल खराबे
कुही :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. गावोगाव भेटीगाठी, कार्यक्रमांतील उपस्थिती, तसेच सोशल मीडियावरील सक्रियता यामुळे निवडणुकीचे औत्सुक्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात काम केलेले अनेक आजी-माजी सदस्य पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेक माजी सदस्य आपल्या नावाचा गाजावाजा करण्यात मश्गूल असले तरी विकासकामांचा उल्लेख मात्र क्वचितच करताना दिसतात.
रस्ते-विकास, पाणीपुरवठा, सिंचन सुविधा, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पातळीवरील कोणतेच ठोस बदल न करता प्रसिद्धीपुरता कार्यकाळ घालवल्याची नाराजी सर्वत्र व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर तर “काम काही नाही, आणि जाहिरात मात्र मोठी!” अशा टीका सर्रास पाहायला मिळत आहेत.
• स्थानिकांना ‘स्थानिक’ नेतृत्व पसंत ; बाहेरगावच्या नेत्यांविरोधात नाराजीचा सुर
तालुक्यातील मतदार सामान्यपणे सांगतात की नेतृत्व स्थानिक असले पाहिजे “नागपूरवरून येणाऱ्या नेत्यांनी गावाचं काय बघायचं?” असा सवाल गावागावात ऐकू येतो. गावातील समस्या, लोकांची गरज, विकासाची प्राधान्यक्रम हे समजून घेण्यासाठी स्थानिक नेतृत्वच योग्य असल्याची धारणा अधिक बळावली आहे.

• युवा उमेदवारांचा उत्साह वाढला ; विकासच मुख्य अजेंडा
या निवडणुकीत तरुण नेतृत्वाची नोंद घेण्यासारखी वाढ झाली आहे. यात डिजिटल कॅम्पेन, घरपोच जनसंपर्क, सर्वसामान्यांशी थेट संवाद या माध्यमातून तरुण उमेदवार लोकप्रियता मिळवताना दिसतात. त्यांच्या अजेंड्यातील प्राधान्यक्रमात रस्ते व पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प, आरोग्य व शिक्षणाच्या सोयी, स्थानिक रोजगार निर्मिती यावर ते ठोस योजना मांडत असल्याने तरुणाईत त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.
• गावोगाव चर्चेला उधाण — कोण ठरणार मुख्य दावेदार?
चहाचे कप, चौक, बाजारपेठा, तर सोशल मीडियापासून गावसभांपर्यंत एकच चर्चा रंगते कोण उभं राहणार? कोणता पक्ष बाजी मारणार? कोणाचा पलडा भारी? . जातीय, सामाजिक आणि पक्षीय गणितं पुन्हा रंगू लागली आहेत. माजी सदस्य, नवीन चेहरे, युवा नेतृत्व—सर्वच गटांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. युवा उमेदवारांचा उत्फुल्ल प्रयत्न, स्थानिक नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा आणि गावोगाव पेटलेल्या राजकीय चर्चांमुळे यंदाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार ठरणार हे निश्चित.







