महागडा फोन अन् दुचाकीचा मोह अंगलट आला, दहावीची मुले सराईत वाहनचोर

नागपूर :- कोवळ्या वयातली मुले आकर्षण आणि मोहाला बळी पडून गुन्हेगारी विश्वात लोटली जाऊ शकतात, हे पाचपावली पोलिसांनी वाहनचोरीत पकडलेल्या तीन अल्पवयीन चोरांकडे पाहून स्पष्ट होत आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अडकल्याने पोलीसांच्या हाती लागलेली ही तिन्ही मुले जेमतेम इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी आहेत. पाचपावली परिसरातल्या एकाच शाळेत एकाच वर्गात शिकणाऱ्या या तिन्ही अल्पवयीन मुलांनी पाळत ठेवून सराईतपणे वाहने चोरल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे.
टेका नाका भागातल्या बाबा बुद्धाजी नगर परिसरातील रहिवासी यांनी २५ नोव्हेंबरला घरासमोर ज्युपिटर दुचाकी उभी केली होती. ती चोरीला गेली. या प्रकरणाचा तपास करत असताना पाचपावली पोलीसांचे पथक बाजीराव साखरे वाचनालयाजवळून जात होते. पोलिसांच्या वाहनाला पाहून हे तिघे पळाले. त्यावर संशय आल्याने पोलिसांनी तिघांनाही पकडले असता वाहनाची कागदपत्रे मागितली. ती त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी दरडावून चौकशी केली असता त्यांनी वाहने चोरल्याचे कबूल केले. महागडा भ्रमणदूरध्वनी आणि वेगवेगळ्या दुचाकींचा मोह जडलेल्या या तीन सराईत चोरांनी पाचपावली आणि जरिपटका पोलीस हद्दीतील पाच वाहने चोरत त्यांची परस्पर विक्री केली.

विशेष म्हणजे तिघेही एकाच दुचाकीवरून फिरत आधी रेकी करायचे. त्यानंतर वाहन निश्चित करून दुचाकी चोरायचे. चोरलेल्या वाहनांची विक्री करून आलेल्या पैशातून त्यांनी महागडे फोनही खरेदी केले. या तिघांनी जरिपटका, पाचपावली पोलीस हद्दीतून चोरी केलेली एक ज्युपिटर, ३ एक्टिव्हा, बजाज पल्सर अशी ५ वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.







