उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी दगडाने ठेचून केला तरुणाचा खून

उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी दगडाने ठेचून केला तरुणाचा खून

नागपूर : उधारीच्या पैशांवरून झालेला किरकोळ वाद इतका टोकाला गेला की त्यातून एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भरतवाडा परिसरातील युवराजस्वामी आरामशिन जवळ २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. मृत तरुणाचे नाव महेश लतेलुराम डहारे (वय २२) असे आहे. महेश हा आपल्या कुटुंबाचा आधार होता आणि तो एका आरामशीनमध्ये मजुरीचे काम करून घर चालवत होता.

महेश ज्या आरामशीनमध्ये काम करत होता, त्याच ठिकाणी चंद्रेश उर्फ रानू वर्मा आणि रितीक नंदेश्वर हे दोघेही कामाला होते. यांच्यात काही दिवसांपासून उधारीच्या पैशांवरून वाद सुरू होता. हा वाद अधिक तीव्र झाला. त्यानंतर दोन आरोपींनी संगनमत करून महेशवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे. आरोपींनी महेशच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार केले. वार इतके भीषण होते की महेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने महेशला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कलमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपींविरुद्ध हत्या (कलम ३०२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी चंद्रेश उर्फ रानू वर्मा याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. दुसरा आरोपी रितीक नंदेश्वर हा गुन्हा घडताच फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.