कुही पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कत्तलीसाठी जनावरांची अमानुष अवैध वाहतूक उघड – ७.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

कुही पोलिसांची धडाकेबाज कारवाई : कत्तलीसाठी जनावरांची अमानुष अवैध वाहतूक उघड – ७.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

कुही : प्राण्यांच्या छळावर अंकुश ठेवत कुही पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरे वाहतूक करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाचगाव पोलीस चौकीच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. एमएच-४० बीएल-८५५४ या पांढऱ्या रंगाच्या बुलेरो पिकअपमध्ये उमरेडहून नागपूरच्या दिशेने गायी, कालवड आणि बैल यांची अमानुष पद्धतीने पाय व तोंड आखूड दोऱ्यांनी बांधून, चारा-पाणी न देता, दाटीवाटीने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

प्राप्त माहितीनुसार मौजा कळमना शिवारातील मुकुंदा ढाब्याजवळ नाकाबंदी उभारण्यात आली असता ८ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता संशयित वाहन नाकाबंदि दरम्यान दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा देताच चालकाने वाहन न थांबवता निर्जनस्थळी नेले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहनाची तपासणी करताना पोलिसांना मोठी अमानुषता आढळून आली. वाहनातून ५ पांढऱ्या रंगाच्या गाई – प्रत्येकी रु.१५,००० , ३ लाल रंगाचे कालवड – प्रत्येकी रु. १०,००० , ४ काळ्या रंगाचे गोरे – प्रत्येकी रु. १०,००० , १ पांढरा बैल – रु. १५,०००. अशी एकून १,६०,००० रुपये किमतीची जनावरे , बुलेरो पिकअप वाहन किंमत ६,००,००० रुपये असा एकूण ७,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन आणि पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात, सपोनि शितल राणे, सफौ. चांगदेव कुथे, पोहवा ओम रेहपाडे, पोअ. आशिष खराबे आणि पोहवा गजानन कविराजराव यांनी केली. घटनेचा पुढील तपास सफौ. चांगदेव कुथे करीत आहेत.