सख्खा भाऊ, पक्का वैरी ! क्षुल्लक वादातून धाकट्याला संपवलं, मृतदेह जाळून नाल्यात ; CRPF च्या निवृत्त जवानाचं संतापजनक कृत्य

सख्खा भाऊ, पक्का वैरी ! क्षुल्लक वादातून धाकट्याला संपवलं, मृतदेह जाळून नाल्यात ; CRPF च्या निवृत्त जवानाचं संतापजनक कृत्य

नागपूर : संपत्तीच्या वादातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या निवृत्त जवानाने आपल्या सख्ख्या लहान भावाची हत्या करुन मृतदेह जाळला. ही थरारक घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव सावंगी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे. अरुण रामाजी तुरारे (वय 43), असं मृताचं नाव आहे. तर चंद्रशेखर रामाजी तुरारे (वय 58, दोन्ही रा.मोहपा), असं अटकेतील मारेकऱ्याचं नाव आहे. अरूण हे शेतकरी होते.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी अरूण व त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना हे शेतात गेले होते. ज्योत्स्ना या बाजूच्या शेतात काम करीत होत्या. सायंकाळी त्या अरूण जिथे काम करीत होते त्या शेतात आल्या. पण तिथे आल्यावर त्यांना आपले पती अरूण दिसले नाहीत. त्यांनी शोध घेतला असता अरूण आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी मोहपा पोलिसात अरूण हे बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांना मोहगाव सावंगी परिसरातील नाल्यात जळालेले मानवी अवशेष आढळले. घटनास्थळावर आढळलेल्या वस्तूनंतर अरूण यांची ओळख पटली.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. ज्योत्स्ना यांनी चंद्रशेखर याच्यावर संशय व्यक्त केला. संपत्तीच्या वाटणीवरून दोन्ही भावांमध्ये वाद असल्याचं सांगितलं. पोलिसांनी संशयाच्या आधारे चंद्रशेखर याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता चाकूने वार करून अरूण यांची हत्या केल्याचे कबुल केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी चंद्रशेखरला अटक केली.