लोककला जिवंत ठेवण्याची परंपरा जोपासते सोनेगाव (कुकूडउमरी)ची मंडई : लोककलेला 61 वर्षाचा इतिहास ; मंडईला उत्सवाचे स्वरूप

लोककला जिवंत ठेवण्याची परंपरा जोपासते सोनेगाव (कुकूडउमरी)ची मंडई : लोककलेला 61 वर्षाचा इतिहास ; मंडईला उत्सवाचे स्वरूप

मनोहर हारगुडे

कुही : तालुक्यांतर्गत गोसेखुर्द प्रकल्प बाधित सोनेगाव (कु.) गावात यंदाही ग्रामगौरव सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे लोककलेच्या सादरीकरणातून मनोरंजन, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोककला जीवंत ठेवने ही भूमिका असून 61 वर्षाची मंडई लोककलेची परंपरा टिकवून पंचक्रोशीत नाव रूपास आलेली सोनेगाव (कु.)ची मंडई समाज जागृती चे माध्यम ठरली आहे.

कुही तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधित सोनेगाव (कु.) या गावाने गेल्या 61 वर्षापासून जनजागृती कलापथक या नावाने मंडईची परंपरा पिढ्यानपिढ्या चालू ठेवली असून गावातील प्रत्येक घरात कलावंत तयार झाले आहेत. सोनेगावची मंडई म्हणजे वर्षातून एकदा येणारा सण असून गावातील प्रत्येक घरी यानिमित्ताने पाहुणे मंडळींची रेलचेल असते मनोरंजनाशिवाय समाजातील अंधश्रद्धा, मागासलेपणा, निरक्षरता, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, महिला सक्षमीकरण, संविधान जागृती आदी विषयांवर मंडईच्या माध्यमातून अखंडितपणे समाज जागृती चे काम सुरू ठेवले आहे. मंडईचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष  चंदन मेश्राम यांचे हस्ते घेण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावातील व परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामगौरव उत्सवात जनजागृती कलापथक सोनेगाव येथील शाहीर राजेराम मारबते साथी दिलीप भोयर यांच्या संपूर्ण पार्टीची लोककला दंडार घेण्यात आली. रात्री युवा समाज प्रबोधनकार दीपक भांडेकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन भाजपा कुही मंडळ अध्यक्ष निखिल येळणे यांच्या हस्ते घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील जुवार होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील पाहुणे मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सरपंच सौरव आंबोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच जगदीश बांते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले.