अख्खं कुटुंब ‘डिजिटल अटके’त ; कारवाईची धमकी देत उकळले 1.40 कोटी

नागपूर : मनी लॉड्रिंगप्रकरणात अटक करण्याची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी आयुध निर्माणीतील एक निवृत्त अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांना तब्बल दहा दिवस डिजिटल अरेस्ट केले. या काळात गुन्हेगारांनी या कुटुंबाकडून तब्बल एक कोटी ४० लाख रुपये उकळले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार अधिकारी पत्नी व मुलासह नागपुरात राहतात. नऊ डिसेंबर रोजी सायबर गुन्हेगाराने निवृत्त अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला. ‘मी मुंबई पोलिस दलाचा अधिकारी संजीव रॉय बोलत आहे. तुमच्या खात्यातून मनीलॉड्रिंग झाले आहे. ही रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरण्यात आली आहे. तुमच्याविरुद्ध अटक वॉरंटही काढले आहे, असे सांगत त्याने अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲपवर अटक वॉरंट पाठविले. मनीलॉड्रिंगची पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक व राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही याची दखल घेतली आहे. या यंत्रणाही तुम्हाला अटक करतील, अशी धमकी सायबर गुन्हेगाराने अधिकाऱ्याला दिली. त्यानंतर ‘दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी आता तुमच्याशी बोलतील,’ असे म्हणत त्याने अन्य एका व्यक्तीकडे कॅमेरा फिरवला. यावेळी दोन जण पोलिसांच्या गणवेशात तर अन्य साध्या गणवेशात होते. पोलिसाच्या गणवेशात असलेल्या एका गुन्हेगाराने त्यांना अटकेची भीती दाखवली. हे सर्व निवृत्त अधिकाऱ्याची पत्नी व मुलगा बघत होते. अटकेच्या भीतीने तेसुद्धा घाबरले.

अटक टाळण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याने सायबर गुन्हेगाराने दिलेल्या बँक खात्यात एक कोटी ४० लाख रुपये जमा केले. दहा दिवसांनंतरही गुन्हेगार आणखी पैसे मागायला लागले. त्यामुळे अधिकाऱ्याने नातेवाइकांकडे पैशाची मागणी केली. त्याला संशय आला. सखोल चौकशी केली असता अधिकारी व त्याचे कुटुंब डिजिटल अरेस्ट असल्याचे त्याच्या लक्षात आले.







