प्रॉपर्टीचा वादातून काकाकडून पुतण्यावर गोळीबार ; कुटुंबातील अंतर्गत भांडणातून भयंकर घटना

नागपूर : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमगाव परिसरात मालमत्तेच्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत काका, पुतण्या आणि पुतण्याचा मित्र असे तिघे जखमी झाले असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील अंतर्गत वाद हिंसक वळणाला गेल्याने गुमगाव परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना देवतळे आणि त्यांचा पुतण्या प्रवीण उर्फ बबलू चंद्रकांत देवतळे यांच्यात मालमत्तेच्या वादावरून तीव्र शब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. संतप्त झालेल्या पुतण्या प्रवीण देवतळे यांनी आपल्या काकांवर फावड्याने हल्ला केला, ज्यात नाना देवतळे जखमी झाले. या हल्ल्यानंतर स्वसंरक्षणासाठी नाना देवतळे यांनी त्यांच्याकडील परवाना असलेली बंदूक बाहेर काढली. हे पाहून प्रवीण देवतळे आणि त्यांचा मित्र विजय मानावार यांनी काकांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटी दरम्यान बंदुकीतून दोन गोळ्या सुटल्या. यात प्रवीण देवतळे यांच्या पोटात गोळी लागली, तर विजय मानावार यांच्या हाताला गोळी लागली. नाना देवतळे हेही या झटापटीत जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना दिली.

पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच कुटुंबीयांनी आणि नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं. जखमी काका नाना देवतळे यांना हिंगणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, पुतण्या प्रवीण देवतळे आणि त्यांचा मित्र विजय मानावार यांच्यावर बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, या प्रकरणी दोन्ही पक्षांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







