अवघ्या 8 महिन्याच्या अनुष्काची बॉडी छिन्नविच्छिन्न अवस्थेत घराबाहेर सापडली ; नागपुरातील दुर्दैवी घटना

अवघ्या 8 महिन्याच्या अनुष्काची बॉडी छिन्नविच्छिन्न अवस्थेत घराबाहेर सापडली ; नागपुरातील दुर्दैवी घटना

नागपूर : शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा असे असून ती मूळची मध्यप्रदेशातील सेलमिया गावची रहिवासी होती. कामासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून अनुष्काचे कुटुंब नागपुरात आले होते. नरसाळा गावाच्या मागील बाजूस, स्मशानभूमीजवळ नाल्याच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टीत हे कुटुंब वास्तव्यास होते. या परिसरात बाहेरगावाहून आलेले अनेक मजूर आपल्या कुटुंबासह राहतात. ही धक्कादायक घटना मध्यरात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली असावी. अनुष्का आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना अज्ञात प्राण्याने तिला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळानंतर मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांची झोप उडाली. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. काही अंतरावर झोपडपट्टीजवळच छिन्नविछिन्न अवस्थेत अनुष्काचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोर प्राण्याने चिमुकलीच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडल्याचे निदर्शनास आले आहे. तिच्या शरीराचा सुमारे ३० ते ४० टक्के भाग, विशेषतः छाती आणि हात प्राण्याने खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार असून रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधाराचा फायदा घेत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. परिसरात कुत्रे, डुकरे किंवा अन्य वन्यप्राणी असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या घटनेनंतर झोपडपट्टीतील मजूर कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकजण रात्री जागून पहारा देत आहेत. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली असून संभाव्य धोकादायक प्राण्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.