तालुक्यात वाघाचा धुमाकूळ: तीन वेगवेगळ्या घटनांत एक गाय ठार, दोन जनावरे जखमी

तालुक्यात वाघाचा धुमाकूळ: तीन वेगवेगळ्या घटनांत एक गाय ठारदोन जनावरे जखमी

कुही :- तालुक्यात गेल्या २४ तासांत वाघाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले चढवल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. या हल्ल्यांमध्ये एका गाईचा मृत्यू झाला असून, दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पहिली घटना: बोडकीपेठ येथे गाईची शिकार

तालुक्यातील बोडकीपेठ येथील शेतकरी संतोष मडावी यांच्या घराशेजारीच गुरांचा गोठा आहे. गुरुवारी रात्री ८.३०  वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली गुरे गोठ्याबाहेरील झाडाखाली बांधली होती. अचानक जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने मडावी यांनी धाव घेतली. तिथे वाघाने एका गाईची नरडी पकडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर वाघ पळून गेला, मात्र तोपर्यंत गाईचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मडावी यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

दुसरी घटना: सावळी येथे कालवड जखमी

दुसरी घटना सावळी गावालगत घडली. येथील नामदेव करारे यांच्या गोठ्याबाहेर १५ जनावरे बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने एका कालवटीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. शुक्रवारी सकाळी करारे जेव्हा चारा टाकण्यासाठी गेले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. जखमी कालवटीवर सध्या उपचार सुरू आहेत.

 

तिसरी घटना: उमरपेठ शिवारात  हल्ला

तिसरी घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान  उमरपेठ (रिठी) परिसरात घडली. रानमांगली येथील मारोती शेंडे हे त्यांच्या शेतात जनावरे चरायला घेऊन गेले होते. दुपारी जनावरे चरत असताना अचानक वाघाने एका गाईवर झडप घातली. शेंडे यांनी आरडाओरडा केल्याने वाघाने शिकार सोडली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात गाय जखमी झाली आहे.

 

“एकाच दिवसात तीन ठिकाणी हल्ले झाल्याने शेतात जायलाही भीती वाटत आहे. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि वाघाचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.

nav